- पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना 700 हून अधिक शाडू मातीच्या श्रीगणेश गौरी मूर्तींचे विसर्जन
मिरा भाईंदर (महाराष्ट्र विकास मिडिया)- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक विसर्जन स्थळांसोबत निर्माण करण्यात आलेल्या 4 कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव/समुद्रात श्रीगणराय 2423 व गौरीच्या 206 मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या संपन्न झाले. महानगरपालिकेच्या वतीने मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या विसर्जन व्यवस्थेत दीड दिवसाचा विसर्जन सोहळा शांतरितीने पार पडला.
गौरी गणपती विसर्जन प्रसंगी नैसर्गिक तलाव/कृत्रिम तलाव/समुद्र/खाडी येथे एकूण 2423 श्रीगणेश मूर्तींना व 206 गौरी मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. प्रभाग क्रमांक 01 मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 273 गौरी गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 02 मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 249 गौरी गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 03 मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 475 गौरी गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 04 मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 743 गौरी गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 05 मध्ये कृत्रिम तलावात एकूण 19 गौरी गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 06 मध्ये नैसर्गिक तलावात एकूण 870 गौरी गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीसाठी मिरा-भाईंदर महापालिकेमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. महापालिकेस सहकार्य करताना शहरातील सुजाण नागरिकांनी 700 हून अधिक शाडू मातीच्या श्रीगणेशाचे आणि गौरी मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या निर्देशानुसार महापालिका सहाय्यक आयुक्त व अधिकारी यांनी विसर्जन स्थळी पाहणी केली. सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. अग्निशमन सेवक, महानगरपालिका स्वयंसेवक यांच्यासह वैद्यकीय आरोग्य व सार्वजनिक आरोग्य सेवाही कार्यरत होते. सर्व विसर्जन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा तसेच सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती. यापुढील काळातील श्रीगणेश विसर्जन अशाच प्रकारे सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी 01 ते 06 प्रभाग समिती कार्यालय क्षेत्रात सर्व यंत्रणा सुसज्ज असणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनास यापुढेही पुढील श्रीगणेश विसर्जन वेळेस पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या वतीने करण्यात येत आहे.



