उमेदवाराने पक्ष सोडला म्हणून मतदार संघ सोडणे चुकीचा राजकीय संदेश: शैलेश अग्रवाल
आर्वी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार अमर काळे राष्ट्रवादीचे खासदार झाल्यामुळे हा मतदार संघ त्यांच्या पत्नीसाठी राष्ट्रवादीला सोडविण्यासाठी ते आग्रही आहेत. अश्यातच वर्धा लोकसभा क्षेत्राच्या निरीक्षक हिना कावरे यांच्या आर्वी दौऱ्यात कुठल्याही परिस्थितीत हा मतदार संघ सोडू नये ही भूमिका काँग्रेसने मांडली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच वर्धा लोकसभा क्षेत्र राष्ट्रवादीला देण्यात आला. त्यावेळी वर्धा लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडेच ठेवावा यासाठी वर्धा जिल्ह्याचे शिष्टमंडळ सर्वच ज्येष्ठ नेत्यांकडे गेले होते. परंतु त्यावेळी या सर्व नेत्यांना अपयश आले आणि काँग्रेसचे अमर काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणुक लढविली. त्यावेळी राष्ट्रवादीने आर्वी विधानसभा क्षेत्र काँग्रेसकडून सोडवून घेणार असल्याचा शब्द अमर काळे यांना दिला असल्याचे काळे यांच्याकडून बोलल्या जात आहे. अश्यातच आपला उमेदवार गेला म्हणून आपण मतदार संघही त्या पक्षाला सोडून देणे अयोग्य राजकीय संदेश देणारा असल्याचे मत काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी मांडले आहे. याबाबत आर्वी मतदार संघाने जातीय समीकरणांना मागे ठेवत काँग्रेसच्या उमेदवारांना कायम साथ दिली असल्याचे इतिहासातील दाखले त्यांनी वरिष्ठांना दिले.
मागील चाळीस वर्षांपासून काळे कुटुंबाच्या बाहेर उमेदवारी दिली नसल्याने याठिकाणी दुसरे नेतृत्व घडण्याची संधीच मिळाली नाही. आणि पुन्हा महाविकास आघाडी म्हणून विचार करत हा मतदार संघ त्यांच्यासाठी राष्ट्रवादीला सोडून दिल्यास याठिकाणी पक्ष म्हणून काँग्रेस कधीच उभारी घेऊ शकणार नसल्याचे शैलेश अग्रवाल यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन कळविले. त्यांनी आर्वी विधानसभेची विस्तृत माहिती देणारे पत्रही प्रदेशाध्यक्षांना सोपविले. त्यावर नाना पटोले यांचीही भूमिका मतदार संघ सोडणार नसल्याचीच होती. परंतु परस्पर दिल्लीतून काही वाटाघाटी होऊ नये म्हणून शैलेश अग्रवाल यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे व महासचिव के सी वेणुगोपाल यांची भेट घेत कुठल्याही परिस्थितीत आर्वी विधानसभा क्षेत्र मित्रपक्षांना सोडू नये यासाठी कारणमीमांसा करणारे पत्रही पक्ष श्रेष्ठींना दिले.
पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी याविषयी शैलेश अग्रवाल यांच्याशी सहमती दर्शविली असून त्याबाबत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनाही कळविले आहे. यामुळे आता आर्वी विधानसभा काँग्रेस कडेच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.