धर्मनिरपेक्षता आणि न्यायालयीन निष्पक्षतेवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा
दिल्ली (महाराष्ट्र विकास मिडिया) – अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे मुख्य न्यायाधीश D.Y. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सहभाग घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात न्यायालयीन स्वायत्तता आणि धर्मनिरपेक्षतेवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की, न्यायव्यवस्थेने सत्ताधारी नेत्यांपासून धार्मिक कार्यक्रमांमध्ये अंतर ठेवावे, अन्यथा न्यायालयाची निष्पक्षता आणि विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते.
हे प्रकरण त्या पाश्र्वभूमीवर अधिक महत्त्वाचं बनलं आहे, कारण अलीकडील काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवर आधीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. EVM मशीन संदर्भातील प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला क्लीन चिट दिली होती, ज्यामुळे न्यायालयाच्या निष्पक्षतेवर शंका निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील संविधानविरोधी सरकार प्रकरणात तीन वर्षांपासून “तारीख पे तारीख” चालू असून, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. पश्चिम बंगालमधील बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सुमोटो (स्वतः संज्ञान) घेतले, तर महाराष्ट्रातील बलात्कार घटनांवर अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन प्रकरणातही सतत तारखा वाढवल्या जात आहेत.
या सर्व घटनांमुळे न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित होत असून, सोशल मीडियावर या चर्चेला जोर मिळाला आहे. लोकांमध्ये अशी भावना वाढू लागली आहे की, सत्ताधारी नेत्यांसोबत न्यायाधीशांचा अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणे न्यायालयाच्या स्वायत्तता आणि निष्पक्षतेला धोका पोहोचवत आहे.
याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा पंतप्रधान मोदी न्यायमुर्तींच्या घरी गणपतीला आरती करतांनाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत जोरदार टिका केली आहे.