मुंबई (बदलापुर विकास मिडिया)- सध्या महाराष्ट्रातील राजकारणात ज्या प्रकारे एक एक घटना घडत आहे त्यामुळे प्रशासनावरुन नागरिकांचा विश्वास दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. त्यातील महत्वाची घटना म्हणुन नुकताच झालेल्या ऑडी अपघाताची घटना ज्यामध्ये एका राजकिय नेत्याच्या मुलाची ऑडी जोरदार धडक देते. या घटनेत नेत्याच्या त्या मुलाचे नाव पुर्णपणे पोलिसांनी वगळल्यावर पोलिस प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा जनतेसमोर उघडकीस आला आहे.
नागपुर येथे दारुच्या नशेत गाडी चालवुन जोरदार अपघात होतो आणि त्या गाडीचा मालक त्या ठिकाणाहुन पळ काढतो ज्यामुळे महाराष्ट्रातील सोशल मिडिया पुन्हा एकदा हिट एण्ड रन ची घटना म्हणत दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. विशेष म्हणजे ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी पोलिस प्रशासनाने सदर नेत्याच्या मुलाचे मेडिकल केलेच नाही हे पोलिस चौकशीच्या कागदपत्रांवरुन दिसुन येते. नेत्याच्या मुलासोबत इतर प्रवास करणार्या मित्रांचे मात्र मेडिकल करण्यात आल्याने महाराष्ट्र पोलिस प्रशासन कशा प्रकारे पोलिस तपास करते हे पुन्हा एकदा दिसुन आले.
महाराष्ट्र पोलिस खातं ज्याचं नाव संपुर्ण जगभरात काही वर्षांपुर्वी गुन्हेगारांना आळा बसवणे आणि कसोसीने तपासकार्य करणे म्हणुन प्रसिद्ध होते त्याच पोलिस खात्याचं नाव मागील काही वर्षात पार बदनाम होतांना दिसुन आले. स्थानिक पोलिस प्रशासन पासुन ते वरिष्ठ पातळीवरील पोलिस खात्यातील अधिकारी या महाराष्ट्र पोलिस खात्याची अब्रु वाचावी म्हणुन पुढाकार घेणे आता गरजेचे आहे. ज्या प्रकारे नागपुर, पुणे, ठाणे, मुंबई व राज्यातील बहुतेक शहरातील पोलिस ठाण्यातील पोलिसांचा कारभार पाहिल्यानंतर जनतेने जोरदार टिका करत संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस खात्यातील अधिकार्यांनी आता आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने विविध घटनांमध्ये ठाण्यातील पोलिस ठाण्याला देखील जाब विचारणा करत पोलिस प्रशासनचं तपासकार्य असमाधानकारक असल्याचेही नमुद केले होते.
एखाद्या राजकारण्याच्या मुलाला वाचवण्यासाठी किंवा राजकारण्याच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी जर महाराष्ट्र पोलिस खात्यातील अधिकारीच कायद्याला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करणार तर त्या कायद्याचे सन्मान सामान्य नागरिक कसं काय करणार? हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस खात्याची इमेज भविष्यात सुधरवण्यासाठी किमान पोलिसांनी आत्मचिंतन करत प्रोटोकॉल प्रमाणे प्रामाणिकपणे काम केले पाहिजे अशी जनतेची माफक अपेक्षा आहे.
महाराष्ट्र पोलिस खात्यातील वरिष्ठांनी आता आत्मचिंतन करणे अत्यंत गरजेचे आहे. जनतेसाठी नाही तर आपल्या खात्यातील त्या हजारो पोलिस कर्मचार्यांच्या आणि अधिकार्यांच्या दृष्टीकोणाने जे प्रामाणिकपणे देशसेवेसाठी आणि कायद्याचे रक्षण करण्याच्या हेतुने पोलिस खात्यात कार्यरत झाले. किमान त्या प्रामाणिक पोलिसांचा विचार करुन पोलिस खात्याची इमेज भविष्यात अजुन खालच्या स्तरावर जाणार नाही यासाठी वरिष्ठांंनी आत्मचिंंतन करणे गरजेचे आहे.