अनुशासन, मर्यादा, नम्रता आणि सहनशिलतेचं रूप निरंकारी महिला समागम
डोंबिवली: सद्गुरूच्या कृपेमुळे ब्रम्हज्ञान मिळालं असून या ब्रह्मज्ञानामुळे जीवन सहज सोपं झालं असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथून आलेल्या निरंकारी प्रचारक सिया अधाने यांनी केले. निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी मिशनच्या वतीने डोंबिवली झोन 35 ए अंतर्गत महिला संत समागमाचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन, टेमघरपाडा भिवंडी याठिकाणी रविवारी केले होते. यावेळी उपस्थित महिला जनसमुदायाला संबोधित करतांना त्या बोलत होत्या.
डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या देखरखीखाली पार पडलेल्या या महिला समागममध्ये डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, वाशिंद, शहापूर, कसारा, भिवंडी, मुरबाड आदी ठिकाणाहून हजारो महिला या महिला संत समागममध्ये सहभागी झाल्या होत्या. उपस्थित महिलांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी आदी भाषांमध्ये गीत, विचार, कविता, नाटिका सादर करून संत निरंकारी मिशनचा संदेश दिला.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सिया अधाने यांनी सांगितले कि, कणाकणात निराकार परमात्मा आहे त्याचा आधार घेऊन जीवन जगायचं आहे. सत्संग, सेवा सिमरनच्या माध्यमातून जीवनातील सर्व परिस्थिती कशा हाताळाव्या याची शिकवण मिळते. सदगुरु प्रती विश्वास हवा आणि प्रभू इच्छेला सर्वोपरी मानावे.. जीवन कसं जगायचं हे सद्गुरु शिकवत आहे. प्रत्येक कार्यात ईश्वराला सहभागी करावे म्हणजे जीवन सहज सोपे होते.
जीवन पूर्णतः जगायचं आहे. जे आपल्याला मिळालं आहे ते पूर्ण आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मनामध्ये स्वीकारण्याचा भाव असायला पाहिजे. प्रभूने दिलेले तन मन धन हे आपल्याकडे आहे तरी देखील आपल्याला दुसऱ्यांपेक्षा कमी मिळालं असल्याची भावना बाळगून मनुष्य दुसऱ्यांशी तुलना करत असतो. जे आहे ते स्वीकारायला हवं.
सकारात्मकता स्वीकारली पाहिजे नकारात्मक भाव नाही आणायचे. जीवन जगताना कमळा प्रमाणे अलिप्त जीवन जगता आलं पाहिजे. दुनियेत राहून दुनियावी गोष्टींचा आपल्यावर परिणाम होता कामा नये. कोणाच्या मनाला दुखापत होईल अशा गोष्टी बोलू नये ही समज सद्गुरुने दिली आहे. आपल्या समस्या असतील त्यात देखील सद्गुरू ला सहभागी करा, समस्येचं निराकरण होईल. सद्गुरू कडून भक्ती आणि विश्वास मागा, जीवन सुखमय होईल.



