बार्शी, आष्टी, मंगरुळपीर, कारंजा लाड़, शहादा, करमाळा आणि मोताळा तालुक्यातील ‘फार्मर कप’ गटांनी आपल्या बैलांना सजवून गट शेतीचे महत्त्व पटवून दिले आहे. बार्शी टाकळी तालुक्यात भरारी महिला शेतकरी गटाने बैलांच्या शिंगांना SOPs ची माहिती सांगणारे कार्ड लावून सजवले होते. शिवाय, रासायनिक फवारणी टाळण्याच्या आवाहनांनी सजवलेले बैल गावात फिरत असताना गट शेतीची चर्चा रंगली.
मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी गावातील माँ जगदंबा शेतकरी गटाने उत्कृष्ट बैल जोडी सजावट आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा सत्कार करून बैलपोळ्याला विशेष रंग दिला. तर प्रगती विजय शेतकरी गट, माऊली शेतकरी गटानेही उत्साहात बैलपोळा साजरा केला. शहादा तालुक्यातही पिंपराणी येथील सातपुडा महिला शेतकरी गटाने बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला.
करमाळा तालुक्यातही अन्नपूर्णा महिला शेतकरी गटाने आपल्या बैलाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना गट शेतीत सहभागी होण्याचे आवाहन केले. मोताळा तालुक्यातील लिहा (बु.) गावातील महात्मा फुले गटातील शेतकरी मित्रांनी आपल्या बैलाच्या पाठीवर “गट शेती करूया, स्मार्ट शेती” अशी घोषणा लिहून गावामध्ये गट शेतीचा प्रसार केला.
राज्यातील ‘फार्मर कप’ गटांनी बैलपोळा अनोख्या पद्धतीने साजरा करुन समाजाचे लक्ष गट शेतीकडे वेधले आहे.



