मिरा भाईंदर शहरातील शालेय विद्यार्थी विशेषत: विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने यापूर्वीच आपल्या 36 शाळांमध्ये 200 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र फक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पुरेसे नसून या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे या दृष्टीने महानगरपालिकेने या सर्व शाळांमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणे, त्यांचे जतन करणे व आक्षेपार्ह बाबी आढळल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई करता यावी यासाठी “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” स्थापन केला आहे. सर्व 36 शाळांमधील सीसीटीव्ही फुटेज तेथील कार्यरत पथकामार्फत सकाळी आठ ते रात्री संध्याकाळी चार या वेळेत या कक्षामध्ये तपासले जाणार आहे व यामुळे कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना यांच्यावर कायमस्वरूपी आळा बसणार आहे. सद्य:स्थितीत फक्त महानगरपालिकेच्या शाळांमधील सीसीटीव्ही फुटेज यांच्यावर मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षामार्फत देखरेख ठेवली जाणार असले तरी भविष्यात या उपक्रमाची व्याप्ती वाढवून मनपा हद्दीतील सर्व खाजगी शाळांमधील सीसीटीव्ही फुटेजवर सुद्धा या मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षामार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. सदर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून ते सकाळी आठ ते संध्याकाळी चार या वेळेत या फुटेजची तपासणी करतील व काही आक्षेपार्ह आढळल्यास पुढील कारवाई तात्काळ करण्यात येईल तसेच या फुटेजचा वापर पोलीस यंत्रणेकडून सुद्धा केला जाणार आहे यामुळे कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना होण्यास नक्कीच प्रतिबंध होईल.
या “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे ई – उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह चौथा मजला येथे होणार आहे. सदर कार्यक्रमास माननीय खासदार श्री. नरेश जी म्हस्के, मा. आमदार श्री. प्रतापजी सरनाईक व मा. आमदार श्रीमती गीता जैन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. अनिकेत मानोरकर व अतिरिक्त आयुक्त श्री. डॉ. संभाजी पानपट्टे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे.



